spot_img
spot_img

‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत सायबर गुन्हे व नशामुक्तीवर पथनाट्यातून जनजागृती!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/सादिक बिस्मिल्लाह शेख) धामणगाव बढे येथे पोलीस स्टेशनच्या वतीने ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत सायबर क्राईम तसेच नशामुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रबोधनात्मक पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून, तसेच अप्पर पोलीस अधीक्षकउपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४० ते १०.३० वाजेदरम्यान धामणगाव बढे येथील एम.ई.एस. हायस्कूलमध्ये, तर सकाळी ११ ते ११.४० वाजेदरम्यान धामणगाव बढे बसस्थानक परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले.

पथनाट्यातून विद्यार्थ्यांना व नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश व लिंक याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि नशामुक्त जीवनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

या उपक्रमास पोलीस स्टेशन धामणगाव बढेचे ठाणेदार निखिल निर्मळ तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पथनाट्याच्या माध्यमातून सायबर सुरक्षा आणि नशामुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांसह नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!