घाटबोरी (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे लोकवर्गणीतून उभारण्यात येणाऱ्या बौद्ध विहाराच्या कामाला आता मोठे बळ मिळाले आहे. विहाराच्या उभारणीसाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यांच्या हस्ते बौद्ध विहाराचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर केला. “महापुरुषांचे पुतळे आणि प्रतिमा केवळ शोभेसाठी नाहीत; त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजात समानता आणि बंधुभाव रुजवणे ही खरी जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले. युवकांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन स्वतःच्या आयुष्यात परिवर्तन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार संजय रायमुलकर यांनी धार्मिक स्थळे ही श्रद्धेबरोबरच समाजाला दिशा देणारी केंद्रे असल्याचे सांगत, मेहकर येथील अशोक वाटिकेसाठी दोन कोटींचा निधी तसेच मागासवर्गीय वस्त्यांतील संविधान भवन, सभामंडप आणि रस्त्यांच्या कामांचा उल्लेख केला.
कार्यक्रमाला श्रीमती सूर्यकांता गाडे, डॉ. सिद्धांत गाडे, आशिष रहाटे, भाई प्रदीप अंभोरे, दिलीप खरात, विलास कटारे, सुरेश वाळूकर, दिलीप देशमुख, सरपंच राजकुमार पाखरे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, घाटबोरी, नागेशवाडी आणि टेंभुरखेड येथील आर.ओ. प्लांटचे लोकार्पणही प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पावसामुळे पिकांची परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद करत जाधव यांनी शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.












Total Users : 3481067