मेहकर (हॅलो बुलढाणा) ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केला, मेहकरमधील हॉटेल रायबा येथे राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विशेष म्हणजे या दौऱ्याची कुणालाही खबर लागली नाही! त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने झालेली ही औपचारिक भेट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
रविवार, १३ सप्टेंबर रोजी हॉटेल रायबा येथे अभिजित दिपके यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तथा दमदार आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासोबत त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र दिपके यांचा अचानक झालेला बुलढाणा जिल्हा दौरा आणि स्थानिक राजकीय नेत्यांसोबतचा संवाद अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
या प्रसंगी मेहकरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष किशोर गारोळे, युवा सेना तालुकाध्यक्ष ॲड. आकाश घोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधितांकडून ही केवळ सदिच्छा आणि औपचारिक भेट असल्याचे सांगण्यात येत असले, तरी कोणताही गाजावाजा न करता झालेल्या या ‘साध्या भेटी’मागे आगामी राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी कुजबुज आता सुरू झाली आहे!
आ. खरात म्हणाले…
“ही भेट अचानक घडलेली सदिच्छा भेट होती. यात कोणताही राजकीय हेतू नव्हता. अभिजित दिपके यांना पुढील प्रवासासाठी निघायचे असल्याने ही भेट अत्यंत साधेपणाने आणि अल्पवेळात झाली,” असे आमदार सिद्धार्थ खरात यांनी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना सांगितले.













Total Users : 3461576