बुलढाणा/पुणे (हॅलो बुलढाणा) पुण्याच्या ‘बुलडाणा अर्बन बँकेत’ तब्बल 34 कोटी 77 लाख रुपयांची नियमबाह्य अफरातफर प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. संचालक मंडळाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सोसायटीच्या खात्यांमध्ये पद्धतशीरपणे नियमबाह्यअफरातफर करत तब्बल 34 कोटी 77 लाख रुपयांचा प्रचंड आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या (मल्टीस्टेट) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभाग व्यवस्थापिके विरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांनी बुलढाणा अर्बन सोसायटीचे पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय 68, रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे यांच्यासह इतरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
याप्रकरणी संस्थेचे लेखा परीक्षक मोहन रघुनाथ दलाल (वय 51, रा.बुलढाणा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली असून, 1 जानेवारी 2018 ते 15 डिसेंबर 2025 या दीर्घ कालावधीत हा सुनियोजित गैरव्यवहार सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, शिरीष देशपांडे हे बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी मध्येपश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर योगिनी पोकळे या विभाग व्यवस्थापिका म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. संस्थेच्या अंतर्गत लेखा परीक्षणात या दोघांनी मोठ्या प्रमाणावर अफरातफर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोसायटीच्या संचालक मंडळाने गतवर्षी डिसेंबर 2025 मध्येच दोघांना सेवेतून बडतर्फ केले होते.त्यानंतर संस्थेच्या खात्यांचे सखोल फॉरेंसिक ऑडिट करण्यात आले, ज्यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची सत्यता समोर आल्यानंतर लेखापाल मोहन दलाल यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद नोंदवली. वैधानिक लेखा परीक्षकांच्या अहवालात स्पष्ट झाल्याप्रमाणे या दोघांनी संगनमत करुन संस्थेचे तब्बल 34 कोटी 77 लाख रुपयांचे अतोनात आर्थिक नुकसान केले आहे. सोसायटीच्या वतीने प्राप्त झालेल्या या तक्रार अर्जाची प्राथमिक छाननी व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
▪️ असा केला पदाचा गैरवापर!
आरोपींनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत संस्थेच्या विश्वाला कालिमा फासला आणि बुलढाणा बँक व सोसायटीच्या सर्व नियमांकडे जाणीव पूर्वक पाठ फिरवली. स्वतःच्या व हितसंबंधियांच्याफायद्यासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज लाटणे, कसल्याही नियमांत बसत नसलेली नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर करणे, बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी बिनव्याजी अॅडव्हान्स रक्कम देणे आणि सदर कंपनी बँकेची सबसिडीयरी (सहायक) कंपनी वोटे भासवणे असे प्रकार करण्यात आले. एवढेच नव्हे तर, या कंपनीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची खोटी सही करुन बनावट सदस्यत्व देणे आणि नंतर ते परस्पर रद्द करणे, तसेच रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या अधिकृत संकेत स्थळावर खोटे ताळेबंद (बॅलन्सशिट) अपलोड करणे असे अनेक गंभीर गुन्हेगारी कृत्य त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे.याशिवाय, संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय सोसायटीच्या नावावर मालमत्ता खरेदी करणे, कोणतेही योग्य तारण न घेता मोठ्या प्रमाणावर कर्जे वाटणे, संचालक मंडळाच्या अधिकारावर घाला घालात परस्पर व्याजाची रक्कम माफ करणे, तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकून ती रक्कम सोसायटीच्या खात्यात न जमा करणे, विना परवानगी मेंटेनन्सचा भरमसाठ खर्च करणे आणि कर्जदारांच्या संमती शिवाय त्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम भरुन ती इतर बँक खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे वळविणे आदी गैरप्रकार या कालावधीत झाले आहेत.












Total Users : 3430214