मेहकर (हॅलो बुलढाणा) बैलपोळ्याच्या पारंपरिक उत्सवाला आधुनिक शेतीची जोड देत मेहकर शहरात यंदा भव्य ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शेतकरी बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने ट्रॅक्टर सहभागी झाल्याने मेहकरचा परिसर ट्रॅक्टरच्या दणदणाटाने दुमदुमून गेला.
दि. 10 सप्टेंबर रोजी जानेफळ रोड येथील शिवशक्ती ट्रॅक्टर येथून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते विधिवत ट्रॅक्टर पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते नारळ फोडून ट्रॅक्टर पोळा मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार खरात यांनी शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा देत बळीराजाच्या कष्टाचा तसेच आधुनिक शेतीच्या साथीदार असलेल्या ट्रॅक्टरचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. आकर्षक सजावट केलेल्या ट्रॅक्टरसह शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले. ट्रॅक्टरची दिमाखदार सजावट, शेतकऱ्यांचा उत्साह आणि मिरवणुकीतील जल्लोषामुळे शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. शिवशक्ती ट्रॅक्टर येथून सुरू झालेली मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत शितला माता मंदिर येथे पोहोचली. तेथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.शेतीचा कणा असलेल्या बळीराजाच्या जीवनात ट्रॅक्टरचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीच्या मशागतीपासून विविध कृषी कामांपर्यंत ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा विश्वासू साथीदार ठरला आहे. त्यामुळे बैलपोळ्याच्या पारंपरिक उत्सवासोबत ट्रॅक्टर पोळ्याच्या माध्यमातून आधुनिक शेती, शेतकरी आणि बळीराजाच्या श्रमाचा गौरव करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. परंपरेचा सन्मान आणि आधुनिक शेतीच्या साधनांचा गौरव यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले ते नगराध्यक्ष किशोर गारोळे यांचे सुपुत्र अधिराज गारोळे. आपल्या छोट्या ट्रॅक्टरसह त्यांनी मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकल्या अधिराजचा ट्रॅक्टरसह सहभाग हा उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवासेना तालुकाप्रमुख अँड. आकाश घोडे, तालुका समन्वयक शाम निकम, नगरसेवक महेश रिंढे, नगरसेवक नितीन तुपे, नगरसेवक प्रा. सतीश ताजणे, साहेबराव हिवाळे, संदीप गारोळे, विलास शिंदे, गोपाल गायकवाड, उमेश चनखोरे, योगेश भाऊ, अँड संदीप गवई, सुमित धोटे, अमोल मोरे, गणेश गावंडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि मेहकरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेचा सन्मान, आधुनिक शेतीचा गौरव आणि बळीराजाच्या कष्टाला मानाचा मुजरा ठरलेला हा भव्य ट्रॅक्टर पोळा मेहकरच्या बैलपोळा उत्सवाचे यंदाचे विशेष आकर्षण ठरला.












Total Users : 3429268