सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) पावसाने पाठ फिरवली, महावितरणने वीज गायब केली अन् बँकेच्या कथित अरेरावीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले! या तिहेरी संकटाविरोधात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांनी गुरुवारी सिंदखेडराजा येथे शेकडो शिवसैनिकांसह धडक देत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. माळरानावरील पिके डोळ्यांसमोर करपत असून सोयाबीन हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. कपाशी आणि तुरीनेही माना टाकल्या आहेत. त्यामुळे तालुका तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करून पिकांचे पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी डॉ. खेडकर यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे केली.
अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये पाणी आहे; मात्र महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे ते पिकांपर्यंत पोहोचवता येत नाही. त्यामुळे शेतीपंपांना नियमित आणि सुरळीत वीज द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.
ई-पिक पाहणी करणारे प्रतिनिधी फोन घेत नसल्याच्या तक्रारींवरही तहसीलदारांना जाब विचारण्यात आला. नुकसानभरपाई ठरविणाऱ्या या प्रक्रियेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे खेडकर यांनी बजावले.
भारतीय स्टेट बँकेकडून कर्जमाफीबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा, नवीन अर्ज स्वीकारले जात नसल्याचा आणि शेतकऱ्यांशी अरेरावी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. “शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; प्रश्न सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,” असा निर्वाणीचा इशारा डॉ. खेडकर यांनी दिला.
यावेळी बाबुराव मोरे, शिवा ठाकरे, संदीप मगर, अतिष तायडे, सुदाम काकड, श्रीनिवास खेडकर, छोटू पवार, बाळाजी मेहेत्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.












Total Users : 3429240