spot_img
spot_img

चोरी करून पसार झाला… पण पोलिसांच्या ‘स्पीड अॅक्शन’पुढे खेळ खल्लास! काही तासांत आरोपी जेरबंद; स्प्लेंडरही हस्तगत!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरून पोलिसांना आव्हान देणाऱ्या आरोपीचा जळगाव जामोद पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोध लावत त्याचा खेळ खल्लास केला! पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीला गेलेली मोटारसायकलही हस्तगत केली आहे. या वेगवान कारवाईमुळे जळगाव जामोद पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

उदय कॉलनीतील रहिवासी तथा सेवानिवृत्त शिक्षक यशवंत लक्ष्मण उमरकर (वय ६६) यांनी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान आपल्या घरासमोर हिरो कंपनीची सिल्वर रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल उभी केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने संधी साधत सुमारे २० हजार रुपये किमतीची ही दुचाकी लंपास केली. चोरी झाल्याचे निदर्शनास येताच उमरकर यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक ५६२/२०२६ दाखल केला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संतोष वसंतराव कोथळकर, रा. अयोध्यानगर, जळगाव जामोद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेली एमएच २८ एव्ही ०३०२ क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या नेतृत्वात ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत. गुन्हा घडताच तातडीने कारवाई करून मुद्देमालासह आरोपीला जेरबंद करणाऱ्या जळगाव जामोद पोलिसांनी पुन्हा एकदा ‘कायदा जागा आहे’ हे दाखवून दिले!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!