मलकापूर पांग्रा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) गल्ल्यातील अवघे दीड हजार रुपये लंपास करताना दुकानाची तब्बल ७० ते ८० हजार रुपयांची तोडफोड! मलकापूर पांग्रा येथील दिपाली ज्वेलर्सला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना १ सप्टेंबरच्या सकाळी उघडकीस आली. शटर आणि दोन चॅनल गेटची कुलपे कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याने व्यापारी प्रतिष्ठानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दुकानमालक वसंतराव नारायणराव उदावंत हे ३१ ऑगस्टला सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीनंतर अंदाजे दोन ते तीनच्या सुमारास चोरी झाल्याचा संशय आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर तुटलेली कुलपे आणि आतील तोडफोड पाहून चोरीचा प्रकार समोर आला.
तक्रारीनुसार, चोरट्यांनी गल्ल्यातील अंदाजे १,५०० रुपये चोरून नेले. अपेक्षित मौल्यवान ऐवज हाती न लागल्याने शोकेस आणि काउंटरच्या काचा फोडल्याचे सांगण्यात आले. शटर, चॅनल गेट, कुलपे आणि अन्य साहित्याचे मिळून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. रक्कम दीड हजारांची; पण व्यापाऱ्याला फटका हजारोंचा!
माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन ठोसरे, साखरखेर्ड्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार युवराज रबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मेघने आणि बीट जमादार निवृत्ती पोफळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करण्यात आला असून, चोरट्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक रवाना करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.
उदावंत यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास गतीने सुरू आहे













Total Users : 3378292