बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पत्रकार रमेश चव्हाण यांना जनहिताची बातमी प्रकाशित केल्या च्या कारणा वरून अश्लील शिवीगाळ, दहशत निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी रिफ्लेक्शन कोचिंग क्लासेसचे संचालक भगवान तांगडे व संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करून पत्रकारास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री याना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे. की, दैनिक खोज मास्टरचे मुख्य संपादक तथा पत्रकार श्री. रमेश चव्हाण हे पत्रकारितेच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडत असून, सामाजिक समस्या, प्रशासनातील त्रुटी तसेच सर्वसामान्य नागरिक व विद्याथ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर निर्भीडपणे वृत्तांकन करीत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी कोचिंग क्लासेसकडून आकारण्यात येणाऱ्या लाखो रुपयांच्या फीबाबत तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांवर पडणाऱ्या आर्थिक बोजाबाबत वृत्त प्रकाशित केले होते. सदर वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून रिफ्लेक्शन कोचिंग क्लासेसचे संचालक भगवान तांगडे यांनी पत्रकार रमेश चव्हाण यांच्याविषयी आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.आरोपा नुसार, भगवान तांगडे हे पाच ते सात व्यक्तींना सोबत घेऊन पत्रकार रमेश चव्हाण यांच्या घराजवळ गेले. तेथे त्यांनी अश्लील शिवीगाळ करून दहशतीचे वातावरण निर्माण केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सदर प्रकार हा अत्यंत गंभीर असून, पत्रकाराने जनहिताचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याला धमकावणे, शिवीगाळ करणे व जीवे मारण्याची धमकी देणे, हा पत्रकाराच्या सुरक्षिततेचा तसेच पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा गंभीर प्रश्न आहे.त्यामुळे या घटनेची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून दोर्षीवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. सदर प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा सामाजिक दबाव न आणता, वस्तुनिष्ठ चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार रमेश चव्हाण यांच्या सुरक्षिततेची तातडीने हमी देण्यात यावी अशी मागणी ही निवेदनाच्या अंती करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेश गायकवाड, प्रदेश सदस्य शाहीद शाह, असलम शाह, अकील शाह,सोमनाथ सावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.











Total Users : 3369771