spot_img
spot_img

‘हर हर महादेव’च्या गजराने मेहकर दुमदुमले! सप्तऋषींच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्तांची ५० किलोमीटरची पायी परिक्रमा!

मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) श्रावणातील तिसऱ्या सोमवारचे औचित्य साधत मेहकर तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धेचा महासंगम असलेल्या ‘सप्तऋषी परिक्रमे’ला रात्री प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या हजारो शिवभक्तांच्या गर्दीने परिसर अक्षरशः भगवामय झाला. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण मेहकर तालुका दणाणून गेला!

या खडतर परिक्रमेत भाविक तब्बल ५० किलोमीटरचा पायी प्रवास करून सात प्राचीन ऋषी मंदिरांचे दर्शन घेतात. वडाळी येथील महर्षी वशिष्ठ ऋषी मंदिरातून परिक्रमेला प्रारंभ झाला. त्यानंतर उटी देळप येथील महर्षी बगदालभ्य ऋषी, गोमेधर येथील गौतमेश्वर ऋषी, पाथर्डी येथील महर्षी पाराशर ऋषी, वरवंड येथील महर्षी वाल्मिकी ऋषी, दुर्गबोरी येथील महर्षी दुर्वास ऋषी आणि विश्वी येथील महर्षी विश्वमित्र ऋषी मंदिराला भेट देत भाविक परिक्रमा पूर्ण करणार आहेत.

रात्रीचा काळोख… हातात भगवे झेंडे… मुखी महादेवाचा जयघोष आणि मनात अपार श्रद्धा अशा भक्तिमय वातावरणात शिवभक्तांची ही अभूतपूर्व वारी मार्गस्थ झाली. परिक्रमा मार्गावर स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी चहा, फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. भक्तीच्या या महासागरामुळे संपूर्ण मेहकर तालुका अक्षरशः शिवमय झाला आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!