जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धावलेल्या दोन तरुणांना मृत्यूनेच गाठल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा खुर्द शिवारात घडली. बेंबळा नदीत बुडून धिरज विजय गवई (वय २२, रा. निंभोरा खुर्द) आणि अविनाश राजेश सावळे (वय १७, रा. जानोरी, ता. शेगाव) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसर सुन्न झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धिरज गवई, त्याचा चुलत भाऊ संघर्ष अरुण गवई आणि अविनाश सावळे हे तिघे निंभोरा खुर्द शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. म्हशी पाणी पिण्यासाठी बेंबळा नदीकडे गेल्याने तिघेही नदीवर पोहोचले. याचवेळी संघर्ष गवई पाण्यात बुडू लागला.
संघर्षला वाचवण्यासाठी धिरज आणि अविनाश यांनी क्षणाचाही विचार न करता नदीच्या पाण्यात धाव घेतली. दोघांनी संघर्षला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने धिरज आणि अविनाश स्वतःच खोल पाण्यात बुडाले. ज्याला वाचवण्यासाठी दोघांनी जीवाची बाजी लावली, तो संघर्ष बचावला; परंतु त्याच्या दोन सोबत्यांना आपला जीव गमवावा लागला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. घटनेनंतर निंभोरा खुर्दसह जानोरी गावावरही शोककळा पसरली असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जळगाव जामोद पोलिसांनी धिरज गवई आणि अविनाश सावळे यांच्या मृत्यूप्रकरणी अनुक्रमे मर्ग क्रमांक ५६/२०२६ आणि ५७/२०२६, कलम १९४ बीएनएसएसनुसार नोंद केली आहे. पुढील चौकशी पोलीस हवालदार अतुल मोहाळे करीत आहेत.











Total Users : 3369546