जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या कथित अनियमित उपस्थितीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक नियमित उपलब्ध राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबत असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक वासुदेव राजनकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित ग्रामसेवकांच्या उपस्थितीची आणि कामकाजाची वस्तुनिष्ठ चौकशी करून त्यांची बदली करावी, अशी मागणी शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव जामोद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
खेर्डा ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता शेजोळे यांच्या उपस्थितीबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद आहे. विविध दाखले, नोंदी आणि प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवावे लागत आहेत. मात्र ग्रामसेवक नियमित उपलब्ध नसल्यामुळे अनेक कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी ग्रामसेवकाची नियमित उपस्थिती, जबाबदार कामकाज आणि ग्रामस्थांशी योग्य समन्वय अत्यावश्यक आहे. त्यामुळे उपस्थिती नोंदी, प्रलंबित प्रकरणे आणि एकूण कामकाजाची प्रशासकीय पातळीवर सखोल तपासणी करावी; तक्रारी तथ्यपूर्ण आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच श्रीमती शेजोळे यांची खेर्डा ग्रामपंचायतीतून बदली करून त्यांच्या जागी नियमित उपस्थित राहणाऱ्या कार्यक्षम ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणीही निवेदनात आहे.
निवेदनावर प्रकाश भिसे, संजय भुजबळ, वासुदेव राजनकर, अनंता बकाल, सोनू देशमुख आणि राजेंद्र परिहार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता गटविकास अधिकारी या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचा बडगा उगारतात की ग्रामस्थांना पुन्हा कार्यालयाच्या चकराच माराव्या लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3354666