धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/सादिक बिस्मिल्लाह शेख) रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून स्नेह, विश्वास, आदर आणि सुरक्षिततेची भावना जपणारा सण आहे. याच भावनेतून लक्ष्मीबाई विद्या मंदिर, धामणगाव बढे येथील विद्यार्थिनींनी धामणगाव बढे पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट देत पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने विद्यार्थिनींनी त्यांच्या हातावर प्रेमाची राखी बांधली. यावेळी पोलिसांच्या कार्याबद्दल आदर, सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थिनींच्या या आपुलकीच्या उपक्रमामुळे पोलीस बांधवांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाचे कौतुक करत पोलीस बांधवांनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य भेट देऊन त्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थिनी आणि पोलीस बांधव यांच्यात निर्माण झालेला हा स्नेहबंध सामाजिक एकता, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा ठरला.यावेळी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. निखिल निर्मळ, सर्व पोलीस कर्मचारी, लक्ष्मीबाई विद्या मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य जाधव, चालक कर्मचारी श्री. समाधान काळे, श्री. सचिन वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये समाजाप्रती कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि सन्मानाची भावना रुजविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. पोलीस बांधवांनी केलेल्या प्रेमळ स्वागताबद्दल तसेच विद्यार्थिनींना दिलेल्या शालेय साहित्याबद्दल लक्ष्मीबाई विद्या मंदिर परिवाराने पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. निखिल निर्मळ व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.











Total Users : 3352841