बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सर्पदंश झालेल्या आदिवासी गर्भवती महिलेला बांबूची झोळी करून रस्ता नसलेल्या चाळीस टपरी गावातून जळगाव जामोदला उपचारार्थ नेत असताना वाटेतच तिला मृत्यूने गाठले अन् समाजमन सुन्न झाले.देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले नुकताच 80 वा स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा झाला परंतु या घटनेमुळे (हा कसला स्वातंत्र्याचा उत्सव?हा कसला विकास?) असा प्रश्न निर्माण झाल्याची भावना स्वातीताई वाकेकर यांनी शब्दबद्ध केली आहे.
स्वातंत्र्याला 80 वर्षे झाली.चंद्रावर पोहोचण्याच्या, डिजिटल इंडियाच्या, विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारतोय पण जळगाव जामोद तालुक्यात आजही एका आदिवासी गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी बांबू आणि चादरीची झोळी करावी लागते, यापेक्षा मोठी शरमेची गोष्ट काय असू शकते? चाळीस टपरी येथील अवघ्या 22 वर्षांच्या गर्भवती सादुरी राधेश्याम खरात यांना 25 ऑगस्ट रोजी सर्पदंश झाला. गावाला पक्का रस्ता नाही. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तिला बांबूच्या झोळीत टाकून, खांद्यावर उचलून रुग्णालय गाठले. मात्र तिचा वाटेतच श्वास थांबला.’एकीकडे सर्पाचे विष शरीरात पसरत आहे. दुसरीकडे पोटात बाळ आहे आणि आईला वाचवण्यासाठी तिचे नातेवाईक तिला खड्ड्यातून खांद्यावरून घेऊन धावत आहेत’ याची कल्पनाही करवत नाही. ही फक्त एका महिलेची दुर्दैवी कहाणी नाही. ही व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे. जळगाव जामोदच्या ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशासारख्या जीवघेण्या परिस्थितीत आवश्यक उपचाराची व्यवस्था नसेल, तर मग ग्रामीण आणि आदिवासी भागातील गरीब माणसाने आजारी पडल्यावर जायचे कुठे? एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रेफर…
जळगाव जामोदहून खामगाव…
खामगावहून अकोला…
आणि या सगळ्या धावपळीत आई आणि तिच्या पोटातील बाळाचा जीव गेला,त्याचे काय?
या मृत्यूची जबाबदारी कोणाची! गावाला पक्का रस्ता देणे ही कृपा नाही, सरकारची जबाबदारी आहे.
वेळेवर रुग्णवाहिका मिळणे ही मागणी नाही, तो नागरिकांचा हक्क आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णाला तातडीचे उपचार मिळणे ही अपेक्षा नाही, ही आरोग्यव्यवस्थेची मूलभूत जबाबदारी आहे.
मग इतक्या वर्षांच्या सत्तेनंतरही आदिवासी भागातील लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी बांबूची झोळी का वापरावी लागते?
जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे हे अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. विकासाची कामे झाली असतील, अनेक योजना आल्या असतील; पण ज्या विकासाच्या रस्त्यावरून एका गर्भवती महिलेला सुरक्षितपणे रुग्णालयात नेता येत नाही, त्या विकासाचा सामान्य आदिवासी माणसाला काय उपयोग? आज एका घरातील चूल कायमची विझली आहे.
एका आईने मुलगी गमावली आहे. एका कुटुंबाने पत्नी गमावली आहे.
आणि एका अजन्म्या बाळाने जग पाहण्या आधीच या व्यवस्थेची किंमत चुकवली आहे.
▪️शोक व्यक्त करून हा विषय संपवू नका!
सादुरी खरात यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.चाळीस टपरीला कायमस्वरूपी पक्का रस्ता कधी होणार, याची कालबद्ध घोषणा झाली पाहिजे.
आदिवासी भागासाठी सक्षम रुग्णवाहिका व्यवस्था झाली पाहिजे.जळगाव जामोद आणि परिसरातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील आवश्यक उपचार आणि ASV (Anti-Snake Venom) उपलब्ध आहे की नाही, याची तातडीने तपासणी झाली पाहिजे. आदिवासींच्या जीवाची किंमत शहरातील माणसाच्या जीवापेक्षा कमी नाही.15 ऑगस्टला आपण तिरंगा फडकवला, स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला.
पण त्या स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही जर आपल्या देशातील एका गर्भवती बहिणीला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात जावे लागत असेल, तर त्या तिरंग्याखाली उभे राहून आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारला पाहिजे..
‘खरंच विकास झाला आहे, की फक्त विकासाच्या घोषणा झाल्या आहेत?’ मेनस्ट्रीम माध्यमांनीही या घटनेकडे डोळेझाक करू नये. जिल्ह्यातील राजकारण आणि निवडणुकीच्या बातम्यांपेक्षा एका तरुण गर्भवती महिलेचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. ही पोस्ट कोणत्याही राजकीय वैरासाठी नाही.
ही पोस्ट त्या आईसाठी आहे जी आज जिवंत असती…
जर तिला वेळेवर रस्ता मिळाला असता.
जर तिला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती.
जर तिला वेळेवर योग्य उपचार मिळाले असते.
सादुरी खरात यांना खरी श्रद्धांजली फुलांचा हार नाही. चाळीस टपरीला पक्का रस्ता,आदिवासी भागातील रुग्णांना सक्षम आरोग्यव्यवस्था व वेळेवर रुग्णवाहिका मिळणे हीच त्या अजन्म्या बाळासह गेलेल्या आईला खरी श्रद्धांजली!











Total Users : 3353342