लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) शेगाव-पंढरपूर आणि मुंबई–नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या सुलतानपूर बसथांब्यावर दररोज हजारो प्रवासी आणि विद्यार्थी येतात. मात्र, याच वर्दळीच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाला अतिक्रमण, कचरा, दुर्गंधी आणि अंधाराचा विळखा पडला आहे. त्यामुळे विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासन नेमके कुणाच्या दबावाखाली अतिक्रमणाकडे डोळेझाक करीत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
स्वच्छतागृहाकडे जाणारा मार्गच अतिक्रमणामुळे बंद झाल्याने महिलांची प्रचंड कुचंबणा होत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि प्रकाशव्यवस्थेच्या अभावामुळे अनेक महिला स्वच्छतागृहाचा वापर टाळत आहेत. मूलभूत सुविधा देण्याच्या नावाखाली ग्रामपंचायत केवळ कागदी घोडे नाचवत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुलतानपूरमध्ये रुग्णालयांसह विद्यालये, महाविद्यालये, पॉलिटेक्निक, फार्मसी आणि नर्सिंगच्या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थिनी दररोज बसथांब्यावर थांबतात. तरीही त्यांच्या सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष संतापजनक आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी २४ ऑगस्ट रोजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली. स्वच्छतागृह परिसरात नियमित स्वच्छता, देखभाल आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई न केल्यास कष्टकरी संघ ग्रामस्थ व प्रवाशांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि मेहकर पोलिसांना देण्यात आल्या आहेत. आता ग्रामपंचायत अतिक्रमणावर हातोडा चालवते की पुन्हा ‘चालढकल’ करते, याकडे सुलतानपूरकरांचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3352835