spot_img
spot_img

मुंबईत आंदोलन पेटणार!कडेकोट बंदोबस्त; रविकांत तुपकर भूमिगतच! झाडांनाही पोलिस सुरक्षा; मरीन ड्राईव्हवर ‘क्रांतिकारी’चे अनेक शिलेदार पोलिसांच्या ताब्यात;आमदार निवास परिसरातून जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही अटक!

मुंबई/बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या आजच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, कालपासून सुरू असलेली कार्यकर्त्यांची धरपकड आजही सुरूच आहे. मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे शासकीय बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आमदार निवास परिसरातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही काही वेळापूर्वी अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

या आंदोलनाची सर्वाधिक चर्चा होण्याचे कारण ठरले आहे ते म्हणजे मंत्रालय परिसरातील झाडांनाही देण्यात आलेली पोलिस सुरक्षा! मागील आंदोलनावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या काही शिलेदारांनी मंत्रालय परिसरातील उंच झाडांवर चढून आंदोलन केले होते. आंदोलकांना झाडांवरून खाली उतरवताना मुंबई पोलिसांसह प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाली होती. त्या हटके आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.यावेळी तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. मंत्रालय परिसरातील झाडांभोवतीही पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला असून, आता आंदोलकांपासून मंत्र्यांचे बंगलेच नव्हे, तर झाडांचेही संरक्षण करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

▪️तुपकर मात्र अजूनही ‘आऊट ऑफ रडार’!

महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला असला तरी रविकांत तुपकर नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.तुपकर आज सकाळी १० वाजता मंत्रालय परिसरात आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांचा एवढा कडेकोट बंदोबस्त असताना तुपकर अचानक आंदोलनस्थळी प्रगटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!