देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) आज सायंकाळी 5.30 च्या सुमारास शहरातील संजय नगर परिसरातील एका पडक्या घरात नवजात अर्भक आढळल्याने आज एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने जन्मानंतर हे अर्भक निर्जनस्थळी टाकून दिल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असून, या धक्कादायक घटनेने माणुसकीलाच काळिमा फासला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता कुवारे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर तसेच नितीन मिंड आणि जितेंद्र जाधव यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी करून पुरावे सुरक्षित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
अर्भकाच्या मृतदेहाची भटक्या कुत्र्यांनी विटंबना केल्याने ते स्त्री जातीचे की पुरुष जातीचे, हे प्राथमिक पाहणीत स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण, जन्माची वेळ व अन्य बाबी समोर येणार आहेत.
दरम्यान, हे अर्भक येथे कोणी आणि केव्हा आणून टाकले? या अमानुष कृत्यामागे कोण आहे? परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रुग्णालये आणि प्रसूतीविषयक नोंदी तपासून दोषींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता देऊळगाव राजा पोलिसांसमोर आहे.











Total Users : 3341809