spot_img
spot_img

BIG CRIME! ‘मागच्या महिन्यात मी पाजली, आज तुम्ही दारू पाजा’ एवढे म्हणताच वाद पेटला! मावस काकाने चाकूने केले सपासप वार; साकेगावात तरुण रक्ताच्या थारोळ्यात!

चिखली (हॅलो बुलढाणा) दारू पाजण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील साकेगाव येथे २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. मावस काकाने धारदार चाकूने सपासप वार केल्यामुळे २९ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या जबाबानुसार, शंकर पुंडलिक नाडे हा गावातील आपले मावस काका महादेव भिका भालेराव यांच्या घरी गेला होता. “मागील महिन्यात मी तुम्हाला दारू पाजली होती, आज तुम्ही मला दारू पाजा,” असे त्याने म्हटले. यावर महादेव यांनी आपल्याजवळ दारू नसल्याचे सांगून तेथून निघून जाण्यास सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

वादानंतर शंकर घराकडे निघाला असता, आरोपीने घरातून सुरा आणून त्याचा पाठलाग केला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने डोके, चेहऱ्याखालील भाग, पाठ तसेच दोन्ही हातांच्या तळव्यांवर सपासप वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हल्ल्यात रक्तबंबाळ झालेला शंकर जमिनीवर कोसळला. आरडाओरड ऐकून गल्लीतील नागरिकांनी धाव घेत त्याची सुटका केली.

नातेवाइकांनी त्याला तातडीने चिखली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्याला बुलढाणा येथे हलविण्यात आले.

या प्रकरणी रायपूर पोलिसांनी महादेव भालेराव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!