जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) बुलढाणा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा गड मानल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ‘सहकार पॅनल’ने पुन्हा एकदा आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी तब्बल १९ जागांवर विजयाचा झेंडा फडकवत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडविला. स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर जिल्हा बँकेतील सत्तेचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
सहकार पॅनलकडून प्रतापराव जाधव, आकाश फुंडकर, संजय गायकवाड, मयूर बाहेकर, डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रसेनजीत पाटील, जालिंदर बुधवत, पांडुरंग पाटील, राजेश देशमुख, दिनेश काळणे, कावेरी सोनसळे, अंकुशराव पडघान, सुनील उदयकर, गोविंदराव मिरगे, श्रीकांत मारोडे, पुष्पाबाई बारवकर, अस्मिता हेलगे, संजय रायमुलकर आणि गोविंद मापारी यांनी विजय मिळविला. परिवर्तन पॅनलचे ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे यांनी मात्र दोन जागा खेचून आणत आपले अस्तित्व कायम राखले.
१९ विरुद्ध २! या निकालाने सहकार पॅनलला निर्विवाद सत्ता मिळाली असली, तरी आता खऱ्या अर्थाने त्यांच्या कामगिरीची परीक्षा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ कर्जपुरवठा, अडचणीतील सहकारी संस्थांना बळ, खातेदारांना दर्जेदार सेवा आणि बँकेच्या व्यवहारात पारदर्शकता या अपेक्षांचे मोठे ओझे नव्या संचालक मंडळाच्या खांद्यावर आहे.
बहुमताचा डोंगर उभा राहिला; आता विकासाचा झेंडा किती उंच फडकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विजय दणदणीत झाला, पण कारभारही तितकाच दमदार होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3337383