spot_img
spot_img

BIG BREAKING! रेतीमाफियांच्या मुसक्या आवळा! तहसीलदारांवरील जीवघेण्या हल्ल्याविरोधात पटवारी संवर्गाचे सहा दिवसांपासून ‘काम बंद’; कर्तव्यदक्ष एसपी निलेश तांबे यांच्या कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि महसूल पथकाच्या वाहनाला टिप्परने धडक देऊन जिवे मारण्याचा कथित प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघाच्या देऊळगाव राजा तालुका शाखेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीवर पटवारी संवर्ग ठाम असून आंदोलन अधिक तीव्र होत आहे.

दरम्यान, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि युवा नेत्या भाग्यश्री खेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक पटवारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी संपूर्ण घटनेची तसेच आंदोलनामागील मागण्यांची माहिती जाणून घेतली. या भेटीमुळे आंदोलनाला राजकीय वर्तुळातूनही गांभीर्याने घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१९ ऑगस्ट रोजी तहसीलदार डोंगरजाळ या ग्राम महसूल अधिकारी आकाश बरात, शिपाई ताठे आणि वाहनचालक भोपळे यांच्यासह अंढेरा परिसरात गस्तीवर होत्या. पथकाने परवान्याविना चार ब्रास रेतीची वाहतूक करणारे पांढऱ्या रंगाचे टिप्पर पकडले होते. त्यावेळी लाल रंगाच्या ब्रिझामधून आलेल्या हर्षल मनोहर अंभोरे याने टिप्पर चालकाला वाहन पळवून नेण्याची चिथावणी दिल्याचा आरोप आहे.

पाठलागादरम्यान ब्रिझा कार आडवी लावून शासकीय वाहनाचा मार्ग रोखण्यात आला. त्याचवेळी टिप्परने पथकाच्या वाहनाला धडक देत अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा कथित प्रयत्न केल्याचे संघटनेच्या निवेदनात नमूद आहे.

काम बंद आंदोलनामुळे महसूल विभागाच्या नियमित कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांचीही गैरसोय वाढत आहे. तालुकाध्यक्ष संजय वरांडे, उपाध्यक्ष तेजस शेटे आणि सचिव सुमित जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी प्रकरणात तातडीने लक्ष घालून आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. आता ‘खाकी’चा निर्णायक प्रहार कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!