सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा /वसीम शेख) नाशिकहून नागपूरकडे मित्रांसह निघालेल्या तरुणांच्या प्रवासाला समृद्धी महामार्गावर अपघाताचे गालबोट लागले. भरधाव स्कॉर्पिओचा मागील टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले. या भीषण अपघातात अमन साहू गंभीर जखमी झाले असून, अन्य नऊ जणांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३५ वाजण्यापूर्वी नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे घडली.
छत्रपती संभाजीनगर येथील सीआरओकडून अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळाकडे धावले. पोलीस उपनिरीक्षक अनिता ईर्शिद यांच्या नेतृत्वातील पथक दुपारी १२.०५ वाजता पोहोचले. तेथे सीजी ०८ बीसी ४४०५ क्रमांकाची स्कॉर्पिओ पलटी झालेल्या अवस्थेत आढळली.
चालक हेमंत विश्वकर्मा (वय २४, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) हा मित्रांसोबत नाशिकहून नागपूरकडे जात होता. स्कॉर्पिओच्या मागील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला आणि क्षणार्धात वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर स्कॉर्पिओ पलटी होऊन रस्त्यावर आदळली.
अपघातात अमन साहू (वय २५) गंभीर जखमी झाले. टीकास बांदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, हेमंत विश्वकर्मा, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा आणि नवीन साहू यांना किरकोळ दुखापत झाली. सर्व जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे सिंदखेडराजा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने हटवून दुसरबीड टोलनाक्यावर ठेवण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली. पोलीस, एमएसएफ आणि क्यूआरटी पथकाने दुपारी ३.२५ वाजता कारवाई पूर्ण केली.












Total Users : 3329589