मलकापूर (हॅलो बुलढाणा) पहाटे वृत्तपत्र घेण्यासाठी पायी निघालेल्या ७४ वर्षीय वृद्धाला बेदरकारपणे चालविण्यात आलेल्या ट्रकने समोरून जबर धडक दिली. ट्रकचे चाक वृद्धाच्या डाव्या पायावरून गेल्याने पाय मांडीपासून गंभीररीत्या तुटला. उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. मलकापूर शहरातील वर्दळीच्या तहसील चौकात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रमेश किसन रायपुरे (वय ७४, रा. धोंगर्डी, ता. मलकापूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कामानिमित्त मलकापूरला आले होते. तहसील चौकात चहा घेतल्यानंतर पोस्ट ऑफिससमोरील दुकानातून वृत्तपत्र घेण्यासाठी ते पायी जात होते.
याचवेळी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-२८-बीबी-६६३४ क्रमांकाच्या ट्रकचालकाने वाहन डाव्या बाजूने न घेता निष्काळजीपणे उजव्या बाजूने आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ट्रकने रायपुरे यांना समोरून धडक दिल्याने ते दुभाजकाजवळ कोसळले. त्यांचा डावा हात दुभाजकावर आदळला, तर ट्रकचे चाक डाव्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
नागरिकांनी आरडाओरड करून ट्रक थांबविला. रायपुरे यांना तातडीनेने मलकापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले; मात्र १४ ऑगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृताचे पुत्र डिगांबर रायपुरे यांच्या जबाबावरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम १८४ व १३४ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १२५(अ), १२५(ब) आणि १०६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.












Total Users : 3329700