spot_img
spot_img

‘माझ्याशी बोल… नाहीतर Instagram वर फोटो व्हायरल!’ शाळेबाहेर विद्यार्थिनीचा पाठलाग अन् हात पकडला; जामोदमध्ये ‘त्या’ तरुणावर पोक्सोचा फास!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) शाळा म्हणजे विद्यार्थिनींसाठी सुरक्षित ठिकाण; मात्र जामोद येथील एका विद्यालयाच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्याशी बोलली नाही तर तिचे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकीही तरुणाने दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हा कथित प्रकार १३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जामोद येथील जनता विद्यालय परिसरात घडला. आरोपीने अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग केला. त्यानंतर वाईट उद्देशाने तिचा हात पकडून, “तू माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

एवढ्यावरच न थांबता आरोपीने मुलीच्या वडिलांसह त्यांच्या नातेवाइकांनाही जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. मुलीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी अजिंक्य जगन्नाथ ताडे, रा. जामोद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७८, ३५१(३), २९६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहेत. आरोपांची सत्यता पोलीस तपास व न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!