मेहकर (हॅलो बुलढाणा) राजकारणात आश्वासनांचे फुगे उडवणारे अनेक जण पाहायला मिळतात; मात्र दिलेल्या शब्दाला कृतीची जोड देत बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणारा लोकप्रतिनिधी वेगळाच ठरतो. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या रोजगार अभियानातून समोर आलेली एका तरुणाची यशोगाथा सध्या विशेष चर्चेचा विषय बनली आहे.
आमदार खरात यांचा मोबाईल अचानक वाजला-‘ट्रिंग-ट्रिंग!’ पलीकडून आवाज आला, “साहेब, मी वैभव बोलतोय!” हा तोच वैभव, जो मागील वर्षी आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात स्वतः नोकरी मिळविण्याच्या अपेक्षेने मुलाखत देण्यासाठी आला होता. त्या मेळाव्यात त्याची नामांकित कंपनीत निवड झाली. मेहनत, गुणवत्ता आणि मिळालेल्या संधीचे सोने करत वैभवने कंपनीत स्वतःचे स्थान निर्माण केले. आता काळाने अक्षरशः वर्तुळ पूर्ण केले आहे. मागील वर्षी नोकरी मागणारा वैभव यंदाच्या रोजगार मेळाव्यात कंपनीचा प्रतिनिधी म्हणून सुमारे १५० बेरोजगार तरुणांच्या मुलाखती घेऊन त्यांना नोकरीची संधी देण्यासाठी मेहकरमध्ये येणार आहे
“मागील वर्षी नोकरीसाठी आलेला मुलगा आज इतरांना नोकरी देण्यासाठी येत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. प्रत्येक कुटुंबातील किमान एका मुलाला नोकरी मिळवून देणे हा माझा संकल्प आहे,” अशी भावना आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांच्या खांद्यावर स्वार होऊन स्वतःची राजकीय पोळी भाजणारे अनेक नेते जनतेने पाहिले; पण तरुणांना केवळ घोषणा नव्हे, तर थेट कंपन्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आमदार खरात करीत असल्याची भावना समर्थक व्यक्त करीत आहेत. मागील रोजगार मेळाव्यातून अनेक युवक नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत झाले असून त्यांच्या कुटुंबांच्या चुलींना रोजगाराचे बळ मिळाले आहे.















Total Users : 3315458