spot_img
spot_img

दोन महिन्यांच्या पायी प्रवासानंतर ‘श्रीं’ची घरवापसी! खामगाव-शेगाव १७ किलोमीटर रस्त्यावर वाहनं नव्हे, फक्त भक्तांचीच रीघ; लाखोंच्या जयघोषात पालखी स्वगृही!

शेगाव (हॅलो बुलढाणा) ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने आज खामगाव ते शेगाव मार्ग अक्षरशः दुमदुमून गेला! पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांचा पायदळ प्रवास पूर्ण करून श्री संत गजानन महाराजांची पालखी लाखो भाविकांच्या साक्षीने स्वगृही संतनगरी शेगावात परतली.

खामगाव येथून आज पहाटे पाच वाजता पालखीने शेगावकडे प्रस्थान केले. या अंतिम १७ किलोमीटरच्या टप्प्यात रस्त्यावर वाहनांपेक्षा भक्तांचीच रीघ अधिक दिसत होती. भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा गजर, मुखी श्रींचा जयघोष आणि पावलोपावली उधळली जाणारी फुले यामुळे संपूर्ण मार्गाला भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झाले होते.

विशेष म्हणजे या सोहळ्यात युवा वर्गाचा सहभाग लक्षवेधी ठरला. हजारो तरुणांनी पालखीसोबत पायी चालत भक्ती, शिस्त आणि सेवेचा अनोखा संगम घडवून आणला. मार्गावरील गावागावांत भाविकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत करत वारकऱ्यांसाठी पाणी, फराळ आणि प्रसादाची व्यवस्था केली.

सकाळी अकरा वाजता श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर शेगावच्या मुख्य मार्गांवरून पालखीची नगरपरिक्रमा सुरू झाली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी करत दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

सायंकाळी सहा वाजता पालखी श्री गजानन महाराज मंदिरात भव्य-दिव्य थाटात दाखल होणार असून, या ऐतिहासिक क्षणासाठी अवघी संतनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!