सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी अखेर शासनाची तिजोरी उघडली आहे! ऐतिहासिक मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ स्मारक परिसराच्या अनुषंगिक विकासकामांसाठी राज्य शासनाने तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
डॉ. खेडेकर यांनी १४ जुलै २०२६ रोजी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करून ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ योजनेतून ५० कोटींची मागणी केली होती. जिजाऊंच्या जन्मभूमीला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्यासाठी आवश्यक सुविधांची गरज त्यांनी शासनासमोर ठामपणे मांडली होती.
अखेर नगरविकास विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी करत सिंदखेडराजा नगरपरिषद हद्दीतील ‘मातृतीर्थ राजमाता जिजाऊ स्मारक येथे अनुषंगिक कामे करणे’ या प्रकल्पासाठी ५० कोटींच्या निधीवर शिक्कामोर्तब केले.
या निधीतून स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण, आधुनिक पर्यटक सुविधा, अंतर्गत रस्ते, आकर्षक प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांसह विविध विकासकामे होणार आहेत. प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी हा निधी मैलाचा दगड ठरणार आहे. आता मातृतीर्थाच्या विकासाला वेग मिळणार असून, सिंदखेडराजा पर्यटनाच्या नकाशावर नव्या दिमाखात झळकणार आहे!















Total Users : 3310422