बुलढाणा (हॅलो बुलढाणा) समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंचीवर वसलेल्या बुलढाण्याची ओळख कधीकाळी स्वच्छ, सुंदर आणि आल्हाददायक हवेचे शहर अशी होती. मात्र आज शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर साचलेला प्रचंड कचरा आणि त्यातून सुटणारी असह्य दुर्गंधी बुलढाण्याच्या या लौकिकालाच काळिमा फासत आहे. ‘सौ दवा, एक हवा… ऐसी बुलढाणा की ताजी हवा’ असे अभिमानाने सांगणाऱ्या बुलढाणेकरांवर आता प्रवेशद्वारांवरच नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे!
बुलढाणा शहराची अस्मिता, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छ प्रतिमेशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याची भूमिका राधेश्याम चांडक (भाईजी) यांनी मांडली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, विस्तारीकरण, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि लगतच्या ग्रामीण भागामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढले; मात्र त्याच्या योग्य व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारायला
कोणही तयार नसल्याचे चित्र आहे.
बुलढाण्यात मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषी आणि इतर महाविद्यालयांत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील जवळपास सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांचे पालक तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना शहराच्या प्रवेशद्वारांवरच कचरा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नगर परिषद की ग्रामपंचायत हद्द कोणाची, याच्याशी बाहेरून येणाऱ्यांना देणेघेणे नसते; बदनामी मात्र संपूर्ण बुलढाण्याची होते!
यापूर्वी संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार करूनही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी थेट हस्तक्षेप करून नगर परिषद आणि ग्रामपंचायतींची संयुक्त मोहीम राबवावी, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच DPDC मधून विशेष निधी उपलब्ध करून शहराचे प्रवेशमार्ग तातडीने स्वच्छ करावेत, अशी अपेक्षा भाईजींनी व्यक्त केली आहे.















Total Users : 3309410