spot_img
spot_img

गजानन महाराजांच्या पालखीने खामगाव भक्तिरसात! उद्या शेगावकडे प्रस्थान; २७० पोलिसांचा अभेद्य बंदोबस्त

खामगाव (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज खामगाव शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी महिला मंडळे, भजनी मंडळे, धार्मिक संस्था आणि हजारो भाविक सज्ज झाले असून संपूर्ण शहराला अक्षरशः भक्तीच्या उत्सवाचे स्वरूप आले आहे.

सोमवारी सायंकाळी खामगाव तालुक्यातील आवार येथे मुक्काम केल्यानंतर पालखीने मंगळवारी पहाटे खामगावकडे प्रस्थान केले. शहरातील हनुमान-विठ्ठल मंदिर परिसरात पालखीचे स्वागत करण्यात येणार असून वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर पालखी विक्रम चौक, टिळक पुतळा, नंदनगर, फरशी आणि श्रीराम चौक मार्गे नॅशनल हायस्कूलमध्ये पोहोचणार आहे. येथे पालखीचा मुक्काम होईल आणि उद्या सकाळी पालखी संत नगरी शेगावकडे मार्गस्थ होणार आहे.

पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. एक अपर पोलिस अधीक्षक, तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, पाच पोलिस निरीक्षक, २५ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांसह तब्बल २७० पोलिस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.

पालखी मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी वळविण्यात आली असून भाविकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक संस्थांकडून प्रसाद, भोजन आणि आवश्यक साहित्याची हजारो पाकिटे तयार करण्यात आली आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!