मेहकर/घाटबोरी (हॅलो बुलढाणा) वाढदिवस म्हटलं की केक, हारतुरे, जाहिराती आणि अनावश्यक खर्चाचा दिखावा… पण मेहकरच्या ॲड. माधुरी देवानंद पवार यांनी याच परंपरेला समाजसेवेची वेगळी दिशा देत वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हातात थेट शैक्षणिक साहित्य दिले आहे.
देवानंद पवार फाऊंडेशन आणि सप्तशृंगी महिला अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या महिनाभरापासून मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये लेटरबुक वाटपाचा उपक्रम सुरू असून आतापर्यंत जवळपास ४० शाळांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच लेटरबुक देण्यात आले आहेत. घाटबोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रमोद देशमुख होते. सरपंच राजकुमार पाखरे, साहित्यिक संतोष अवसरमोल, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण वाघमारे यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
संतोष अवसरमोल यांनी, “वडिलांकडून मिळालेले संस्कार समाजातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी वापरून ॲड. माधुरी पवार यांनी बाप-लेकीच्या नात्याला समाजसेवेची सुंदर किनार दिली,” असे गौरवोद्गार काढले












