मलकापूर/मोताळा (हॅलो बुलढाणा) स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असले तरी, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. मलकापूर व मोताळा तालुक्यात अजूनही स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने आज युवा सेनाने आक्रमक पवित्रा घेत ‘शोले स्टाईल’ पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वच्छ पाणीपुरवठा न मिळणे ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येमुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. अशा स्थितीत प्रशासकीय यंत्रणेने तातडीने योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.परंतु यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे मलकापूर व मोताळा तालुक्यातील गावांना अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने त्यांच्या आरोग्यावर गदा आली आहे.
मलकापुर तालुक्यातील मोरखेड दहा गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मलकापुर तालुक्यातील मोरखेड, दुधलगाव, लोणवडी, खामखेड, गौलखेड, आळंद, हरणखेड तसेच मोताळा तालुक्यातील न्हावी, दाभाडी, माकोडी या गावातील नागरिकांना मागील अनेक महिन्यांपासून दूषितपाणी पुरवठा केला जातोय.
वॉटर फ़िल्टर बसवा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या या मागणीसाठी आज मंगळवारी युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे व युवासेना मा. तालुकाप्रमुख गणेश सुशिर यांच्यासह जगदीश पाटील,विलास पाटील,चेतन पाटील,गणेश दिक्षीत,क्रिष्णा पाटील,गौरव ठोसर,ईश्वर झनके,लक्ष्मण भिस्ते आदि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवरच जनआंदोलन सुरु केले आहे. जो पर्यंत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी. अन्यथा यापेक्षाही व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.












