बुलढाणा, दि. 28 जुलै (हॅलो बुलढाणा) महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र वरवर दिसत असले, तरी बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आता वेगळेच संकेत देऊ लागल्या आहेत. फेसबुकवरील एका पोस्टवरून भाजपा बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी चिखली तालुक्यातील माजी सरपंच तथा काही महिन्यांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेल्या मनोज लाहुडकरांविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बाहेकर यांच्या तक्रारीनुसार, लाहुडकर यांच्या फेसबुक पोस्टमध्ये शासकीय अधिकारी विद्याधर महाले यांच्याबाबत कथित खोटे, बदनामीकारक व दिशाभूल करणारे आरोप करण्यात आले आहेत. संबंधित पोस्ट हटवून डिजिटल पुरावे जतन करावेत आणि कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीला अनेक नागरिकांनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबाही दिला.
मात्र या प्रकरणाला आता केवळ फेसबुक पोस्टपुरते मर्यादित न पाहता त्यामागील महायुतीतील अंतर्गत राजकारणाचीही चर्चा सुरू झाली आहे. मनोज लाहुडकर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे मानले जात असले, तरी चिखली मतदारसंघात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीच्या आरोपांमुळे ‘युतीधर्म’ नेमका कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
राजकीय कार्यकर्त्यांमध्ये अशीही चर्चा आहे की, मित्रपक्ष वाढवण्याच्या नादात एकमेकांचेच राजकीय खच्चीकरण सुरू राहिले, तर त्याचा थेट फायदा तिसऱ्याला होऊ शकतो. एका फेसबुक पोस्टवरून सुरू झालेला हा वाद आता भाजपा विरुद्ध शिंदे सेना अशा नव्या राजकीय संघर्षाची नांदी ठरणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.












