लोणार (हॅलो बुलढाणा/संदीप मापारी) प्रभावीपणे ‘पोलिस काका व पोलिस दीदी’ उपक्रम राबविण्याचे नियोजन पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळा-महाविद्यालयातील मुलींच्या रक्षणासाठी त्या त्या हद्दीतील पोलिस ठाण्यातील दामिनी पथकाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान पोलीस स्टेशन लोणार यांच्या वतीने सरदार वल्लभाई पटेल हायस्कूल येथे दि. 27 रोजी ‘पोलीस काका पोलीस दीदी’ उपक्रमाबाबत जागर करण्यात आला.
राज्यात सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याने शाळा व महाविद्यालयां मध्ये अघटित व अनपेक्षित घटनांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘पोलिस काका व पोलिस दिदी’ उपक्रमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अघटित घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जनजागृती करण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता ‘पोलीस काका व दीदी’ याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भय राहावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सर्व ठाणेदारांना या उपक्रमाबाबतचे आदेश दिले आहेत.
‘पोलिस काका व पोलिस दिदी’ हा उपक्रम सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.दरम्यान सरदार वल्लभाई पटेल हायस्कूल येथे दामिनी पथकातील अधिकारी पीएसआय घोगरे व पीएसआय गर्जे यांनी महिला सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. काही अनुचित प्रकार घडल्यास डायल 112 वर कॉल करून माहिती देण्याचे ही आवाहन करण्यात आले आहे.यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.












