जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) सोशल मीडियाचा चुकीचा वापर, सायबर गुन्हे, छेडछाड आणि वाढत्या ऑनलाइन धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जानेफळ येथील श्री. स. वि. तथा कनिष्ठ महाविद्यालयात दामिनी पथकाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी प्रभावी जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला.
गुंड, टवाळखोर आणि छेडछाड करणाऱ्यांना अजिबात घाबरू नका. निडरपणे तक्रार करा, पोलीस सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभे राहून न्याय मिळवून देतील,असा ठाम विश्वास पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी विद्यार्थिनींना दिला.
एआयच्या युगात सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो आणि माहिती शेअर करताना अत्यंत सावध राहावे. तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानासाठी करावा; मात्र त्याच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टच, सायबर फसवणूक, अनोळखी व्यक्तींपासून सावधगिरी, छेडछाड व अत्याचाराच्या घटनांमध्ये त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला हेल्पलाईन ११२ आणि बाल मदत क्रमांक १०९८ यांचीही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामदास धामोडकर होते. सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. धामोडकर यांनी केले.












