बुलडाणा (हॅलो बुलढाणा) राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले केवळ ₹५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान म्हणजे प्रामाणिक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. ही रक्कम तातडीने ₹२ लाख करण्यात यावी, अन्यथा नियमित कर्जदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर पुन्हा तीव्र आणि आक्रमक आंदोलन उभारू, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला.
सध्या तुपकर राज्यव्यापी दौऱ्यावर असून पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. पुढील दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातही बैठका घेऊन नव्या आंदोलनाची रणनीती निश्चित केली जाणार आहे.
“अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज वेळेवर भरण्यासाठी नातेवाईकांकडून किंवा खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे उचलले. मग प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यांना शिक्षा का? नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?” असा संतप्त सवाल तुपकर यांनी उपस्थित केला.
२०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, प्रोत्साहन अनुदानाबाबत सरकारने मौन बाळगल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आतापर्यंतच्या तीनही कर्जमाफी योजनांत तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कर्जमाफीच्या निकषांत बसणाऱ्या शेतकऱ्यांकडून काही बँका टक्केवारीची वसुली करत असल्याच्या तक्रारीही तुपकरांनी मांडल्या. “सरकारने बँक व्यवस्थापकांना आवरले नाही,क तर क्रांतिकारी शेतकरी संघटना त्यांना धडा शिकवेल,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला












