spot_img
spot_img

BREAKING : हर्षवर्धन सपकाळांच्या जिल्ह्यात काँग्रेस-भाजपाची ‘मैत्री’! वरून भाजपाविरोधाचा एल्गार… खाली मात्र ‘कमळा’चा आधार! काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटलांच्या अर्जावर भाजपा कार्यकर्त्याची सही; हर्षवर्धन सपकाळांना ही जवळीक मान्य आहे का?

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीने जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्राचे तापमान चांगलेच वाढवले आहे. मात्र जळगाव जामोद तालुका सोसायटी मतदारसंघातील उमेदवारी अर्जांमुळे काँग्रेसच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२४ जुलै २०२६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत या मतदारसंघातून एकूण पाच अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सहकार नेते प्रसेनजीत पाटील, भाजपाचे परीक्षित ठाकरे, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, ज्योतीताई ढोकणे आणि जुबेर पटेल यांनी निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे तीन उमेदवार मैदानात असले, तरी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि ज्योतीताई ढोकणे यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या बँक प्रतिनिधींच्या अनुमोदक म्हणून सह्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही केवळ निवडणुकीची तांत्रिक प्रक्रिया आहे, की पडद्यामागील काँग्रेस-भाजपा राजकीय समझोता, असा सवाल काँग्रेस कार्यकर्तेच उपस्थित करू लागले आहेत.

यापूर्वी जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही काँग्रेसने प्रसेनजीत पाटील यांच्या विरोधात भाजपाला साथ दिल्याची चर्चा झाली होती. त्यावेळी काँग्रेस विचारधारेच्या मतदारांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता.

राज्यात काँग्रेस आणि भाजपा एकमेकांविरोधात वैचारिक संघर्ष करत असताना स्थानिक पातळीवर नेते परस्परांना मदत करत असतील, तर काँग्रेसची अधिकृत भूमिका नेमकी कोणती? जिल्ह्यातीलच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ही कथित राजकीय जवळीक मान्य करणार, की जिल्हाध्यक्षांकडून खुलासा मागणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!