मलकापूर (हॅलो बुलढाणा) सोशल मीडियावर स्वस्त इलेक्ट्रिक बाईकची जाहिरात दाखवून नागरिकांना मलकापुरात बोलावणे, मारहाण करून लुटणे आणि त्यानंतर ₹१ लाखांच्या बदल्यात ₹१० लाख देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कथित टोळीचा मलकापूर शहर पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना मोटारसायकलसह पकडण्यात आले असून तिघे घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे.
हिवरखेड सोनेवाडी येथील शेतकरी सुभाष माणिकराव गावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मित्राला यापूर्वी इलेक्ट्रिक बाईकच्या आमिषाने मलकापुरात बोलावून मारहाण व लूट करण्यात आली होती. त्यानंतर सुभाष गावंडे यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने “₹१ लाख द्या आणि ₹१० लाखांच्या नोटा घ्या,” अशी ऑफर दिली.
या प्रकाराची माहिती पोलिसांना देताच स्थानिक गुन्हे शाखा आणि मलकापूर पोलिसांनी कुंड फाट्यावरील हॉटेल जयभोलेसमोर सापळा रचला. फिर्यादीजवळ पाच जण आले आणि नोटांचे बंडल दाखवून ₹१ लाखांची मागणी केली. नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला मारहाण करून चाकूचा धाक दाखवत खिशातील ₹५ हजार हिसकावल्याचा आरोप आहे.
पोलिसांचा इशारा मिळताच पाचही जणांनी पळ काढला. पोलिसांनी मयूर खानझोडे आणि अभिषेक इंगळे यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून ‘भारतीय बच्चों का बैंक’ लिहिलेल्या २ हजार नोटा, ₹५ हजार रोकड, धारदार चाकू, मोटारसायकल आणि चार मोबाईल जप्त करण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.












