spot_img
spot_img

मध्यरात्री जळगाव जामोदच्या खांडवीत ‘अदृश्य’ चोरांचा धुमाकूळ… दोन घरांची कुलुपे तोडली; पहाटे कपाट उघडताच उडाला थरकाप! ₹१३.३५ लाखांचा ऐवज लंपास

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील खांडवी गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरांना लक्ष्य करून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ₹१३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या घरफोडीमुळे खांडवी गावासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार, २५ जुलैच्या रात्री ११.३० ते रविवार, २६ जुलैच्या पहाटे ५.३० वाजेदरम्यान घडली. अज्ञात आरोपींनी फिर्यादी चंद्रकांत दिलीप कोल्हे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गावातील आदिनाथ बावस्कार यांच्या घराच्या दरवाजाची कडी उघडून तेथेही चोरी करण्यात आली.

चोरट्यांनी दोन्ही घरांतील कपाटे फोडून त्यामधील ₹२ लाख २० हजारांची रोख रक्कम, तसेच अंदाजे ₹११ लाख १५ हजारांचे जुने वापरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ₹१३ लाख ३५ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

विशेष म्हणजे, चोरट्यांनी दोन्ही घरांतील मौल्यवान वस्तू अचूकपणे शोधल्याने त्यांनी चोरीपूर्वी परिसराची रेकी केली होती का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ४८१/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!