spot_img
spot_img

Exclusive: फ्लॅट पाहायला गेल्या… अन् काही क्षणांत पाच मजली इमारतीखाली आढळला मृतदेह! चिखलीच्या शाहूनगरमधील ‘त्या’ बांधकामात नेमकं काय घडलं?

चिखली (हॅलो बुलढाणा) बहिणीसाठी नवीन फ्लॅट खरेदी करण्याच्या उद्देशाने बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमध्ये पाहणीसाठी गेलेल्या महिलेचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चिखली शहरातील बीडीसीसी बँकेच्या पाठीमागील परिसरात घडली. वर्षा गुलाबराव चेके (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात मर्ग क्रमांक ४२/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भास्कर लक्ष्मण चेके (वय ६९, व्यवसाय शेती, रा. सुरा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी पोलिसांकडे तोंडी माहिती दिली.

पोलिस नोंदीनुसार, वर्षा चेके आणि मनोरमा श्रीकृष्ण कुसळकर या दोघी चिखली येथील बीडीसीसी बँकेच्या पाठीमागील लेआउटमध्ये बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट पाहण्यासाठी गेल्या होत्या. अपार्टमेंटची पाहणी सुरू असताना वर्षा चेके या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्या.

घटना लक्षात येताच उपस्थितांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी वर्षा चेके यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून चेके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमध्ये संभाव्य ग्राहकांना पाचव्या मजल्यापर्यंत नेताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती का, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जिने आणि मजल्यांच्या मोकळ्या भागात मजबूत रेलिंग, संरक्षक जाळी, बॅरिकेडिंग, धोक्याच्या सूचना अथवा सुरक्षित मार्गाची व्यवस्था होती का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

वर्षा चेके यांचा तोल नेमका कसा गेला, त्या अपार्टमेंटच्या कोणत्या भागातून खाली पडल्या आणि बांधकामस्थळी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाले होते का, याचा तपास चिखली पोलिस करीत आहेत. पुढील तपास पोलिस हवालदार गजानन जनार्धन काकडे करीत आहेत.

महत्त्वाची नोंद: पोलिसांनी सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नसून, अकस्मात मृत्यूची मर्ग नोंद केली आहे. तपासात निष्काळजीपणा अथवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!