spot_img
spot_img

एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक… ₹१ कोटी घेतले, १०९ प्लॉट गायब केले अन् खरेदीदारालाच आरोपी बनवलं? नांदुऱ्यातील ‘त्या’ दोघांवर अखेर गुन्हा दाखल!

नांदुरा/आरमोरी (हॅलो बुलढाणा) नागपूर जिल्ह्यातील तब्बल १०९ अकृषक प्लॉटच्या व्यवहारात ₹१ कोटींची फसवणूक, एकाच क्रमांकाचा कथित बनावट मुद्रांक आणि मूळ खरेदीदारालाच गुन्ह्यात अडकविण्याचा गंभीर आरोप समोर आल्याने नांदुरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदुरा येथील दोन व्यक्तींविरुद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती फिर्यादीच्या जबाबातून समोर आली आहे.

सुरत येथे वास्तव्यास असलेले तांदूळ व्यापारी तथा जमीन व्यावसायिक मोहम्मद तौहिद हाजी हनिफ जादा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भिवापूर परिसरातील सर्व्हे क्रमांक ३०० मधील जमीन खरेदीसाठी २०१९ मध्ये एकूण व्यवहार ठरला होता. त्यापैकी ₹१ कोटी रोख, धनादेश आणि आरटीजीएसद्वारे जमीनमालकाला दिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

यानंतर जमीन अकृषक करून सुरुवातीला ८७ आणि पुढे एकूण १०९ प्लॉट तयार करण्यात आले. या प्रकल्पाला महारेराचे नोंदणी प्रमाणपत्रही मिळाल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, प्लॉटचे भाव वाढल्यानंतर पूर्ण प्लॉट देण्याऐवजी केवळ ४० प्लॉट देण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचा आरोप आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीकडे असलेल्या यूडी ७७८०१३ क्रमांकाच्या मूळ करारनाम्याच्या मुद्रांकासारखाच कथित बनावट मुद्रांक तयार करून उलट फिर्यादीविरुद्धच भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणी व्यंकटा फजेंद्र बाबू ऊर्मी आणि लक्ष्मी नारायणा ऊर्मी, दोघेही रा. नांदुरा, यांच्यावर संगनमताने ₹१ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रकरणातील कागदपत्रे, करारनामा, पॉवर ऑफ ॲटर्नी आणि मुद्रांकाची सत्यता आता पोलीस तपासात स्पष्ट होणार असून, या कोट्यवधींच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा हात आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!