अंढेरा (हॅलो बुलढाणा) देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे २९ वर्षीय तरुणाने शेतातील बेलाच्या झाडाला गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना २३ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली. सुरज रामभाऊ तेजनकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या आईच्या तक्रारीवरून पत्नी वंदना सुरज तेजनकर आणि सतीश रामेश्वर काकडे यांच्याविरुद्ध अंढेरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी शशिकला तेजनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुरजचे २०२१ मध्ये वंदनासोबत लग्न झाले होते. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. मात्र कौटुंबिक मतभेदानंतर वंदना माहेरी राहत होती. सुरज वारंवार फारकतीची मागणी करत होता; मात्र फारकत दिली जात नसल्याचा तसेच वंदनाचे सतीश काकडे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर सुरजविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सततचा मानसिक त्रास आणि कौटुंबिक तणावाला कंटाळून सुरजने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. अंढेरा पोलिस पुढील तपास करत आहेत











