spot_img
spot_img

‘चोर… चोर…!’ मध्यरात्री तहसील इमारतीत किंकाळी; छतावरून उडी मारताच एक रक्तबंबाळ, दुसरा अंधारात गायब… ₹41 हजारांच्या चोरीमागे नेमकं कोण?

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) येथील नवीन तहसील बांधकामाच्या इमारतीत मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या थरारक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधारात मजुरांच्या खोल्यांवर डल्ला मारल्याचा आरोप असलेल्या दोन इसमांपैकी एकाला पाठलाग करून पकडण्यात आले, तर त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

23 जुलै रोजी रात्री सुमारे 2 वाजता वॉचमन गणेश श्रीरंग साळुके यांना अचानक “चोर-चोर” असा आवाज ऐकू आला. ते इमारतीत धावत गेले असता दोन इसम नवीन तहसील इमारतीवरून उडी मारून जुन्या तहसीलच्या दिशेने पळताना दिसल्याचे तक्रारीत नमूद आहे. मजुरांनी तत्काळ पाठलाग केला. यावेळी एक इसम खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पायाला व हाताला दुखापत होऊन रक्तस्राव होत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात हलवले. त्याने आपले नाव आफ्रोज शहा दिलावर शहा, रा. प्रतापनगर, देऊळगाव राजा असे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतर मजुरांच्या खोल्यांची पाहणी केली असता प्लायवूड दरवाजाची तार तोडलेली आढळली. गॅस सिलिंडर, ₹20 हजार रोख आणि तीन मोबाईल असा एकूण ₹41 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार आहे.

आता फरार साथीदार कोण? चोरीचा माल नेमका कुठे गेला? या मध्यरात्रीच्या चोरीमागे आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!