spot_img
spot_img

मंदिरात भरदुपारी हातात आरी अन् चाकू घेऊन घुसला इसम! गजानन महाराजांच्या डोक्यावरील चांदीची छत्री कापताना रंगेहात; पुजाऱ्याची नजर पडताच उडाली खळबळ!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात भरदुपारी चोरीचा धक्कादायक प्रयत्न झाल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. गजानन महाराजांच्या मूर्तीवरील चांदीची छत्री चक्क आरीच्या पात्याने कापून चोरण्याचा प्रयत्न करताना एका इसमाला मंदिराच्या पुजाऱ्याने रंगेहात पकडल्याची घटना 21 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

मंदिराचे पुजारी दीपक नंदू इसोकार हे मंदिरात गेले असता पायरीवर चप्पल दिसल्याने त्यांना संशय आला. आत जाऊन पाहिले असता एक इसम गजानन महाराजांच्या डोक्यावरील सुमारे 122 ग्रॅम वजनाची आणि अंदाजे 20 हजार रुपये किमतीची चांदीची छत्री आरीच्या पात्याने कापत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ “चोर-चोर” अशी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ जमा झाले आणि संशयिताला पकडले.

तक्रारीनुसार, पकडलेल्या इसमाने आपले नाव रघुनाथ शंकर माठे (वय अंदाजे 55, रा. पिंपळगाव काळे) असे सांगितले. त्याच्याजवळ आरीचे पाते आणि चाकू आढळल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. जळगाव जामोद पोलिसांकडे याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!