चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटला लक्ष्य करत धाडसी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत इंजिनियर म्हणून नोकरी करणारे चेतन राया जाधव हे 4 मे 2026 पासून कुटुंबासह मुंबईत राहत असल्याने चिखलीतील त्यांचा फ्लॅट बंद होता.
13 जुलै रोजी सकाळी 6.28 वाजता शेजारी राहणाऱ्या महिलेने जाधव यांच्या वडिलांना फोन करून घराचा दरवाजा तुटलेला असून चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला. ही माहिती मिळताच जाधव कुटुंबीयांसह चिखलीत दाखल झाले. घराची पाहणी करताच चोरीचा थरार उघड झाला.
अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी-कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दोन्ही बेडरूमचे दरवाजे आणि कपाटांचे लॉकर फोडून सुमारे 18.9 ग्रॅम वजनाची, अंदाजे एक लाख रुपये किमतीची सोन्याची चेन आणि 41 हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घरातील फर्निचरचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी चिखली पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.










