बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वातानुकूलित कार्यालयात बसून केवळ आदेश सोडणारे अधिकारी अनेकदा पाहायला मिळतात; मात्र बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी थेट गावागावांत आणि चौकाचौकांत उतरून प्रशासन कसे लोकाभिमुख असावे, याचा आदर्श घालून दिला आहे. आज देऊळघाट परिसरात त्यांनी स्वतः उपस्थित राहून मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती केली.
अनेक नागरिकांना अद्याप ‘एसआयआर’ म्हणजे नेमके काय, अर्ज का भरायचा आणि तो न भरल्यास काय परिणाम होऊ शकतो, याची पुरेशी माहिती नाही. ही गंभीर बाब लक्षात घेत तहसीलदार कुमरे यांनी प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधत संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली. गावागावांत जाऊन स्वतः जनजागृती करणारे ते कदाचित जिल्ह्यातील एकमेव तहसीलदार असावेत, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
देऊळघाट येथे नागरिकांना संबोधित करताना तहसीलदार कुमरे म्हणाले, “मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. बीएलओ आपल्या घरी आल्यानंतर आवश्यक फॉर्म अचूकपणे भरून द्यावा. बीएलओची भेट झाली नसेल, तर नागरिकांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधावा. अन्यथा मतदार यादीतून नाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” तहसीलदारांचा हा थेट, धडाडीचा आणि जनहिताचा उपक्रम प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांसाठीही आदर्श ठरत आहे.










