खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट तथा ‘सोनी रक्तपेढी’चे संचालक डॉ. गोपाल सोनी यांचा रविवारी सायंकाळी त्यांच्याच शेतात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपाताचा प्रकार असावा, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने डॉ. सोनी हे सायंकाळच्या सुमारास एकटेच आपल्या शेतात गेले होते. मात्र शेतात पोहोचल्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांत ते मृतावस्थेत आढळून आले. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉक्टरांचा असा अचानक मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डॉ. सोनी यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर खामगाव ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रात्री उशिरापर्यंत तीन संशयितांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून विशेष वैद्यकीय पथक खामगावात दाखल झाले आहे. हा खून आहे, अपघात आहे की मृत्यूमागे आणखी काही धक्कादायक कारण दडले आहे, याचा उलगडा शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतरच होणार आहे.
ठाणेदार तावडे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे स्पष्ट केले आहे.










