spot_img
spot_img

सरसकट कर्जमुक्तीची निर्णायक लढाई उद्यावर! तुपकरांचा सरकारला थेट इशारा — “आज ट्रेलर होता, उद्या गंडवागंडवी केली तर पिक्चर दाखवू!”

मुंबई (हॅलो बुलढाणा) सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी मुंबईत छेडलेल्या आक्रमक आंदोलनाने सरकारचे चांगलेच धाबे दणाणले. विधानभवनावर धडक, सातबाऱ्यांचा वर्षाव, सोयाबीन-कापूस उधळत केलेला संताप आणि त्यानंतर दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मुंबईत शेतकरी आक्रोशाचा भडका उडाला.

या आंदोलनाच्या तडाख्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी दुपारी ४ वाजता बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही बैठक आता शुक्रवार, १० जुलै रोजी सकाळी होणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी तुपकरांना एक दिवस थांबण्याची विनंती केल्यानंतर तुपकरांनी सरकारला अखेरचा इशारा दिला.

“एवढे दिवस थांबलो, आणखी एक दिवस थांबू; पण उद्या सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविम्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर सरकारला महागात पडेल. आजचे आंदोलन फक्त ट्रेलर होते, उद्या गंडवागंडवी केली तर महाराष्ट्राला खरा पिक्चर दाखवू,” असा घणाघाती इशारा तुपकरांनी दिला.

दरम्यान, तुपकरांचा मुक्काम आज आझाद मैदान पोलीस ठाण्यातच होण्याची शक्यता असून, आता संपूर्ण राज्याचे लक्ष उद्याच्या निर्णायक बैठकीकडे लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!