मुंबई (वृत्तसंस्था/हॅलो बुलढाणा) सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, असा गंभीर आरोप करत तुपकर यांनी बुधवारी थेट विधानभवनाच्या दारात शेतकऱ्यांचा संताप नेऊन धडकवला. शेतकऱ्यांसह विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करताना सातबाऱ्यांच्या प्रती भिरकावण्यात आल्या, तर सोयाबीन-कापूस उधळून सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली.
बुधवारी सकाळी सुमारे १० वाजता रविकांत तुपकर शेतकरी व कार्यकर्त्यांसह अचानक विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दाखल झाले. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही तुपकर यांनी प्रवेशद्वारापर्यंत मजल मारली. “शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या”, “सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या”, “पीकविम्याचा प्रश्न तातडीने सोडवा”, “सरकारने दिलेला शब्द पाळा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाला गेल्या महिन्यातील तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. १५ ते १९ जूनदरम्यान बुलढाण्यात तुपकरांनी शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर बिघडली होती. राज्यभरात रास्तारोको, जाळपोळ आणि संतप्त आंदोलने झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करून उच्चस्तरीय बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही ठोस निर्णय न झाल्याने तुपकरांचा संताप पुन्हा उफाळून आला.
विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा रोष पुन्हा थेट विधानभवनाच्या दारात पोहोचला आहे.










