जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील दान चोरीप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथील प्रसिद्ध राम मंदिरात ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके तसेच दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जोरदार ‘रामरक्षा आंदोलन’ केले.
या आंदोलनादरम्यान रामरक्षा पठणासह जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील दानपेटीतील चोरी ही केवळ चोरी नसून देशाच्या श्रद्धेवर झालेला घाला आहे, असा आरोप शिवसैनिकांनी यावेळी केला.
या प्रकरणात फक्त छोट्या माशांवर कारवाई करून विषय दडपण्याचा प्रयत्न होऊ नये. चोरीमागील खरे सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनाला जिल्हाभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. राम मंदिराच्या दान चोरीप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असा इशारा ठाकरे गटाने दिला.











Total Users : 3354245