spot_img
spot_img

सरपंचांच्या दारातच सांडपाण्याचा ‘तलाव’… मग नायगाव देशमुखात स्वच्छतेचा कारभार कोण पाहतोय?

मेहकर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील नायगाव देशमुख येथे सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न आता ग्रामस्थांच्या सहनशक्तीबाहेर गेला आहे. विशेष म्हणजे गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरासमोरच सांडपाणी साचत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे गावात स्वच्छतेच्या कामकाजावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधींच्याच दारात अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य ग्रामस्थांच्या समस्या कोण सोडवणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागत आहे. या घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका डोके वर काढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या प्रश्नाबाबत ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. गावात बंदिस्त गटार असतानाही ती वापरात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. योग्य उतार नसल्याने आणि सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर घाण पाणी साचत आहे.

स्वच्छता, आरोग्य आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने आता कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या घरासमोरच सांडपाण्याचा प्रश्न कायम असेल, तर संपूर्ण गावातील सांडपाणी व्यवस्थापनाची अवस्था किती गंभीर असेल? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामपंचायत या समस्येकडे गांभीर्याने पाहणार की ग्रामस्थांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!