spot_img
spot_img

खाकीच्या कोठडीत काय घडलं होतं? १५ वर्षांनी न्यायाचा घणाघात; पारधी तरुण बेग्या पवार मृत्यू प्रकरणात तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप!

वाशिम (हॅलो बुलढाणा) तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अखेर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे. २०११ मधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत रिसोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन ठाणेदारांसह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी दिलेल्या या निकालाने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे २०११ रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलीस पथकाने हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकली होती. या कारवाईदरम्यान बेग्या पवार या तरुणाला चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप होता. या मारहाणीतच १० मे २०११ रोजी बेग्या पवार यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर सीआयडीने ३४ दिवस तपास करून संबंधित पोलिसांविरोधात खुनाचा गुन्हा तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने तत्कालीन ठाणेदार महादेव धांडे यांच्यासह मदन पवार, शिवाजी खिल्लारी, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश तारम, नागोराव खांडके, अशोक वैद्य आणि वसंत जाधव या नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बेग्या पवार यांच्या आईने आरोप केला की, त्यांच्या मुलाविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नव्हता. केवळ तो पारधी समाजातील असल्याने त्याला अडकवण्यात आले. निकालानंतर आई-वडिलांनी न्यायालय, सीआयडी आणि सरकारी वकिलांचे आभार मानत “उशिरा का होईना, पण न्याय मिळाला” अशी भावना व्यक्त केली. सरकारी वकील श्रीराम काळू यांनी हा निकाल सर्वसामान्यांच्या न्यायावरील विश्वासाला बळ देणारा असल्याचे सांगितले.

हा निकाल फक्त एका कुटुंबाचा विजय नाही, तर सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांसाठी थेट इशारा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!